सांगली : जिल्ह्यास शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात ३९ लाख ६७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून ३८ लाख ६९ हजार खड्डे पूर्ण झाले असले तरी, चांगला पाऊस झाला नसल्याने कामे रखडली आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अधिकाधिक रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध रोपवाटिकांच्या माध्यमातून ३७ लाख ७१ हजार इतकी रोपे तयार आहेत. यापुढे लागणारी रोपेही तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाऊस सुरु होताच वृक्षारोपणाचे काम हाती घेण्यासाठी सर्व यंत्रणांना प्रशासनाने सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात अद्याप म्हणवा तितका पाऊस झालेला नाही. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुुलनेत केवळ ४५ टक्केच पाऊस झालेला आहे. यामुळे खड्डे तयार असूनही वृक्ष लागवड रखडली आहे. जत, कवठेमहांकाळ येथे चार दिवसांपूर्वी मोठा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. दोन दिवसांपासून वाळवा व शिराळा तालुक्यात दमदार पाऊस झाला. तेथेही पावसाने विश्रांती घेतल्याने, वृक्ष लागवड कशी करायची, अशी चिंता प्रशासनासमोर आहे. वृक्ष लागवड केल्यास रोपे वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे प्रशासन सध्या संततधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, सहकारी, नागरी तसेच राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँका, सहकारी पतसंस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, शाळा व महाविद्यालये, तसेच जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, ग्रामपंचायती आणि गावकऱ्यांना वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. काही ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी, ही लागवड अत्यल्प आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील वृक्ष लागवड थांबली
By admin | Published: July 14, 2014 12:27 AM