तासगाव : लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची भुरळ सगळीकडेच दिसून येत आहे. गौतमीच्या अदा पाहण्यासाठी लोक इतके फिदा आहेत की, तासगाव आगारातील एका बसचालकाने त्यांच्या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार असल्याने; दोन दिवस रजेची मागणी केली आहे. तसाच उल्लेख रजा अर्जावर केला आहे. हा रजा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या रजेची भलतीच चर्चा रंगली आहे.
मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आलीय. तिच्या लावणी आणि स्टेज शोच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. याच गौतमी पाटील चा तासगाव तालुक्यात 21 मे रोजी वायफळे येथे कार्यक्रम होणार आहे. गौतमी चा कार्यक्रम तोही पहिल्यांदाच तासगाव तालुक्यात होत असल्यामुळे या कार्यक्रमाची तालुक्यात गौतमीच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या गौतमीचे, सर्वच क्षेत्रात मोठे चाहते निर्माण झाले आहेत. केवळ सोशल मीडियावर पाहायला मिळणाऱ्या गौतमीचा कार्यक्रम प्रत्यक्ष आपल्याच गावात पाहायला मिळणार असल्यामुळे, तिच्या चाहत्यांसाठी ही संधी पर्वणीच.
ही संधी साधण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तासगाव आगारात चालक असणाऱ्या यमगरवाडी येथील एका चालकाने चक्क दोन दिवसांच्या रजेची मागणी केली आहे. 'गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची रजा मिळावी.' असा उल्लेख रजा अर्जावर केला आहे. 22 आणि 23 मे रोजी दोन दिवसांची रजा मिळणेबाबत गुरुवारी आगार प्रमुखांकडे रजा अर्ज दिला आहे.
सबसे कातील गौतमी पाटील! हा डायलॉग अलीकडच्या काळात का फेमस झाला असावा, याचा प्रत्यय देणारा हा रजा अर्ज आहे. रजा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची तालुक्यात जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे.
दरम्यान, या रजा अर्जाबाबत तासगावचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांना विचारणा केले असता, त्यांनी आमच्याकडे अद्याप अशा प्रकारचा रजा अर्ज आला नसल्याचे सांगितले.