सांगली, दि. 14 - बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. ते सुनावणीला हजर राहिले. दोषारोपत्रात बदल करणार असल्याचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिल्याने पुढील सुनावणी १० आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात तीन महिलांचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. सुधीर घोरपडे याच्या बहीण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब ब्रम्हदेव शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटुंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीर घोरपडे याला होता. या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्र रवींद्र कदम व एक अल्पवयीन यांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशिगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आहे. संशयितातर्फे सांगलीतील अॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गुरुवारी खून खटल्यास प्रारंभ झाला. अॅड. निकम उपस्थित होते. त्यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १८ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. भरदिवसा घरात घुसून झालेल्या या तिहेरी खून प्रकरणामुळे जिल्हा हादरला होता. विटा पोलिसांनी दोन दिवसात याचा छडा लाऊन संशयितांना अटक केली होती. गुलबर्ग्यातून चाकू खरेदीसंशयितांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन खुनाचा कट रचला. ब्रम्हदेव शिंदे याच्या घरात कोणी सापडेल, त्याला संपवायचे, असा निर्णय घेतला होता. तेथील एका लॉजवर त्यांनी मुक्काम केला होता. तिथेच त्यांनी तीन चाकू खरेदी केले. पळतील शिंदे वस्तीवर पाणी मागण्याचा बहाणा करुन तिघांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तीन महिलांचा खून केला होता.
पळशीतील तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 9:23 PM