ओळ : पलूस येथे पारधी समाजाच्या मागण्यांबाबत तहसीलदार निवास ढाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्याशी दलित महासंघाचे अध्यक्ष मधुकर वायदंडे यांनी चर्चा केली.
पलूस : पलूस तहसील कार्यालयावर आदिवासी पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी दलित महासंघामार्फत मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गाववार पारधी समाजाचे पुनर्वसन व्हावे, त्याबाबत संबंधित गावातील प्रशासनास आदेश व्हावेत, पुनर्वसन कार्यात अडथळा करणाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तत्काळ कारवाई व्हावी, शासनाच्या घरकूल, ८ अ उतारा, शिधापत्रिका, कसण्यासाठी गायरान, या सर्व सोयी या समाजाला मिळाव्यात. तालुक्यातील आंधळी, कुंडल, बांबवडे आणि पलूस येथील पारधी समाजातील लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.
यावर निवास ढाणे यांनी आंधळी, बांबवडे येथील सरपंचांशी तत्काळ बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या. येत्या १० दिवसात पारधी समाजाच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात दलित महासंघ अध्यक्ष मधुकर वायदंडे, आर. बी. सौदागर, सुधाकर वायदंडे, सनातन भोसले, दिनकर नांगरे, उषा चव्हाण, राजू चव्हाण, राजू काळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.