सांगली : डोंगर कितीही विशाल असला तरी समाजकार्यातून घडलेल्या माणुसकीची विशालता त्यासमोर कमीच भासते. म्हणूनच तासगाव तालुक्यातील बॉम्बे ओ ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशनने गेल्या काही वर्षात देश-विदेशातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवून उभारलेल्या समाजकार्याच्या डोंगराला चक्क हिमालयाने सलाम केला आहे. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्काराने या ग्रुपला गौरविण्यात आले.हिमालयाच्या पर्वतरांगांना कवेत घेतलेल्या हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. हिमालयन सेव्हिवर्स या संस्थेमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात रक्तदानाशी निगडीत काम करणाऱ्या मोजक्याच पन्नास संस्थांना सोबत घेऊन ही संस्था कार्यरत आहे.
या संस्थेने यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार तासगावच्या बॉम्बे ओ ब्लड ग्रुपचा प्रदान केला. दुर्मिळ रक्तगट असूनही देशभरात अशा रक्तदात्यांचे जाळे तासगावच्या या ग्रुपने विणले. विक्रम यादव यांच्या पुढाकाराने उभारलेल्या संस्थेने गेल्या काही वर्षात देशातील, परदेशातील रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे कार्य सुरू आहे. या कार्याची दखल घेत हिमालयन सेव्हिवर्स संस्थेने शहीद दिनाच्या निमित्ताने तासगावच्या या ग्रुपचा सन्मान केला.अध्यक्ष विक्रम विश्रांत यादव, महेश चौगुले, विनोद धोतरे, स्विटी मोरे,स्वप्निल कुंभार, निखिल हारोले, अवधुत जाधव, रश्मी मखमल्ला,रूपाली कुरणे,रोहीत कदम,यांनी स्वीकारला कांगडाचे उपजिल्हाधिकारी ललित पाल, भारतीय कबड्डी संघाचे कर्णधार अजय टाकुर आदी यावेळी उपस्थित होते.
हिमालयन सेव्हिवर्सचे अध्यक्ष हरीष म्हणाले की, रक्तदानासारखे दुसणे पुण्यकार्य कोणते नाही. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. ते फक्त मानवी शरिरात तयार होते. त्या रक्ताला कोणत्या जातीपातीचे बंधन नाही.तासगावच्या संस्थेच्या कार्याने आमची मने जिंकली. देशभरात त्यांनी उभारलेले कार्य हे खुप मोठे आहे.विक्रम यादव म्हणाले की, आम्ही संस्थेच्या माध्यमातुन संपुर्ण देशभर मोफत रक्त पुरवठा करतो. त्यासाठी देशातील अन्य रक्तदानाचे काम करणाऱ्या संस्थांचेही सहकार्य मिळते. त्या सर्व संस्थांचाही हा सन्मान आहे. अत्यंत गरीब रूग्णांना दीड लाखापर्यंतची आर्थिक मदतही आम्ही करीत असतो. आमच्या संस्थेला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्या सर्व रक्तदात्यांना समर्पित करीत आहे, जे रक्ताची गरज पडल्यावर विनामोबदला व निस्वार्थीपणे रक्तदान करतात त्यासाठी वेळ देतात.