सांगली/विटा : माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. शनिवारी (10 मार्च) विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद ठेऊन पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी मंत्री डॉ. कदम यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात खानापूर तालुक्यातून झाली. सन 1968 ला एसटी महामंडळाचे सदस्य झाल्यानंतर विटा बसस्थानकाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते .
कडेगाव तालुक्याच्या निर्मितीपूर्वी विटा हे कदम यांच्या राजकीय वाटचालीचे ठिकाण होते. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणे व निकाल विटा मुख्यालयातच असल्याने यांचा खानापूर तालुक्याशी मोठा स्नेह होता. त्यामुळे डॉ. कदम यांच्या निधनानंतर आज शुक्रवारी विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. विटा शहर व खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीनेही पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.