सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय-निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी व शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये यांच्यासह शहरातील नगरपंचायती व ग्रामपातळीवर ग्रामपंचायती यांचाही उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्या स्तरावर उपक्रमाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेत स्थानिक विक्रेते व पुरवठादारांशी संपर्क करून तिरंगा ध्वज खरेदीचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे महिला बचत गटांनाही तिरंगा ध्वज लावण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.समतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’अंतर्गत दि. ९ ते दि. १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरासमोर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकप्रत्येक घरासमोर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठीच्या नियोजनासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. ११ जुलै २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:29 PM