सांगली : हिमाचल प्रदेशमधील नरेशकुमार श्रीरामसिंह ठाकूर (वय २९) या ट्रकचालकास धमकावून त्याच्याकडील ५८ हजार पाचशे रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. तसेच त्याच्या ट्रकवर दगडफेक करुन चालकाच्या बाजूची काच फोडण्यात आली. माधवनगर-बुधगाव रस्त्यावरील पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोसमोर सोमवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. या घटनेचा सांगली ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावून तीन संशयितांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.अटक केलेल्यांमध्ये संदीप पांडुरंग पाटील (वय ४०), दादासाहेब नामदेव तुपे (३५) व सुरेश भिकू हिवरे (३१, तिघे रा. बुधगाव, ता. मिरज) यांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. तिघेही संशयित सोमवारी रात्री अकरा वाजता दारूच्या नशेत एकाच दुचाकीवरुन (क्र. एमएच १० एपी ८२९२) माधवनगरहून बुुधगावला निघाले होते. त्यावेळी नरेशकुमार ठाकूर हा त्याचा ट्रक (क्र. एचआर ५५ एल ७९३६) पश्चिम महाराष्ट्र डेपोसमोरील ट्रान्स्पोर्ट कार्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत लावत होता. तिघेही संशयित दुचाकीवरून तिथे गेले. त्यांनी ठाकूरला ट्रकमधून उतरण्यास सांगितले. पण तो घाबरल्यामुळे खाली उतरला नाही. संशयितांनी मोठा दगड ट्रकच्या चालक बाजूस घालून काच फोडली. त्यानंतर संशयितांनी ट्रकमध्ये चढून ठाकूरला दमदाटी करुन त्याच्या ताब्यातील ५८ हजार पाचशे रुपयांची रोकड घेऊन पलायन केले.घटनेनंतर ठाकूरने चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. पत्रा डेपोतील कर्मचारी तसेच अन्य ट्रक चालक तेथे जमा झाले. त्यांनी संशयितांचा पाठलागही केला. पण ते सापडले नाहीत. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, उपनिरीक्षक मनोज कांबळे, हवालदार सागर पाटील, शामराव पाटील व नागनाथ पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली व ठाकूर याच्याकडून घटनेची माहिती घेतली. नागरिकांनी गर्दी केली होती. काहीजणांनी संशयित बुधगावमधील असल्याचे सांगितले. त्यांचे वर्णन घेऊन त्यांचा शोध घेण्यात आला. मध्यरात्री एक वाजता तीनही संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या घरावर छापे टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करताना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, धमकावणे, दगडफेक या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटीच्या या घटनेने बुधगाव परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)रोकड सुरक्षित : संशयितांकडून जप्तसंशयितांनी ट्रकवर दगडफेक केल्याने काच फुटून दोन हजाराचे नुकसान झाले आहे. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. चालक ठाकूर याच्याकडील लुटलेल्या ५८ हजार पाचशे रुपयांच्या रोख रकमेबाबत संशयित एकमेकांकडे बोट करीत होते. त्यांची झडती घेतल्यानंतर सर्व रक्कम आहे तशी त्यांच्याकडे मिळाली. ही रोकड जप्त केली आहे. केवळ दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही. ते प्रथमच रेकॉर्डवर आले असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
बुधगाव येथे ट्रक चालकास लुटले
By admin | Published: December 01, 2015 11:07 PM