सांगली : एक्साईज विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून आंध्रप्रदेशमधील ट्रकचालकास धाक दाखवून ४५ हजार रुपयास लुटण्यात आले. शुक्रवार, दि. ४ रोजी दुपारी एकच्यासुमारास अंकलीजवळ हा प्रकार घडला. जानीबाशा उमर शेख (रा. इंटक मपाडू रोड, पन्नूर, जि. गुंटूर) असे लुटलेल्या ट्रकचालकाचे नाव असून, सांगली ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील शेख हा ट्रकचालक काेल्हापूरमधून सांगली येथील भाडे असल्याने सांगलीकडे येत होता. अंकलीजवळ तो आला असताना, चौघांनी ट्रक थांबवत आम्ही राज्य शासनाच्या इक्साईज विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. यावेळी ट्रकच्या केबिनमध्ये असलेली भाड्याची ४५ हजारांची रक्कम त्यांनी काढून घेत तेथून पोबारा केला. त्यानंतर ट्रकचालक शेख याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.