कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी माधवराव मोहिते यांना तीन मुले. थोरले वसंतराव, मधले यशवंतराव व धाकटे जयवंतराव. पुढे वसंतराव मूळ घराण्यातच राहिले, शेतीत रमले, तर यशवंतराव बडोद्याला जिजाबा मोहितेंकडे आणि जयवंतराव आजोळी भोसले घराण्यात दत्तक गेले. २२ डिसेंबर १९२४ रोजी जयवंतराव यांचा जन्म झाला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. आप्पासाहेबांनी दूरदृष्टीने काळाची पावले ओळखत, या भागातील शेतकऱ्यांचे दैन्य आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धी आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. याचवेळी त्यांनी आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला.
अनेक भौगोलिक, राजकीय अडचणींचा सामना करून त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखाना उभा केला. १९६१ मध्ये आप्पासाहेब कृष्णा कारखान्याचे चेअरमन झाले आणि पुढची सलग ३० वर्षे आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सहकारात एक मानदंड निर्माण केला.
त्याकाळात आप्पांनी आखलेल्या धोरणांमुळे आशिया खंडातील सर्वांत मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना अशी कृष्णा कारखान्याची ओळख साऱ्या जगाला झाली. कारखान्याच्या उभारणीमुळे परिसरातील हजारो हातांना काम मिळाले. विधायक दूरदृष्टी ही आप्पासाहेबांची खासियतच होती. ट्रॉलीमधील ऊस क्रेनच्या साहाय्याने उचलून फिडिंग टेबलवर ठेवणारे युनिट महाराष्ट्रात सर्वप्रथम आप्पांनी कारखान्यात आणले.
आप्पांनी देशातील पहिली डिस्टिलरी, पहिले कंट्री लिकर, इंडियन मेड फॉरेन लिकर, ऑसिटोन अशा उपपदार्थांच्या निर्मितीचे प्रकल्प सुरू केले. या विधायक दूरदृष्टीमुळेच सलग २४ वर्षे आप्पांनी सभासदांना राज्यातील सर्वाधिक दर दिला. आप्पांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखान्याची देदीप्यमान वाटचाल सुरू असतानाच, या वाटचालीत उपसा जलसिंचन योजनांच्या निमित्ताने आणखी एक यशाचा तुरा खोवला गेला. आप्पासाहेबांनी कारखान्याच्या पुढाकारातून १७ उपसा जलसिंचन योजना उभ्या केल्या, ज्यामुळे कृष्णेच्या परिसरातील ७२,००० एकर जमिनीने हिरवागार शालू पांघरला. यामुळे गावागावांत आर्थिक सुबत्ता आली. टायरच्या बैलगाड्यांनी ऊसवाहतूक करण्याची कल्पना महाराष्ट्रात सर्वप्रथम आप्पांनीच आणली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आप्पांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या आणि सक्षमपणे चालविल्या. आप्पांनी स्थापन केलेल्या मयूर सहकारी कुक्कुटपालन सोसायटीने त्याकाळात आशिया खंडातील सर्वांत मोठी पोल्ट्री म्हणून नावलौकिक पटकावला. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी कृष्णा सहकारी बँक सुरू केली. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण विकास विश्वस्त संघ छापखाना सुरू केला.
शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजेत, यासाठी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आगाशिवच्या डोंगरपायथ्याला कृष्णा हॉस्पिटल सुरू करून, लाखो रुग्णांवर अद्ययावत पद्धतीचे उपचार माफक दरात उपलब्ध करून अनेकांना जीवदान दिले. मेडिकल कॉलेज स्थापन करून, चांगल्या पद्धतीने चालवून कृष्णा अभिमत विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले.
आप्पासाहेबांचे हे सारे काम बघून प्रभावित झालेले तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी आप्पासाहेबांना विधानपरिषदेचे सदस्यत्व दिले आणि आप्पा आमदार झाले. आप्पासाहेबांना द्रष्टा समाजसुधारक म्हणूनही ओळखले जाते. याची प्रचिती नुकतीच संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिसून आली. ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सर्व अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी आप्पासाहेबांनी जवळपास २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेले कृष्णा हॉस्पिटल हे आताच्या कोरोना काळात केवळ कऱ्हाडसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी जीवनदायिनी ठरले आहे. या हॉस्पिटलने आतापर्यंत ३००० हून अधिक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. आज कृष्णा हॉस्पिटल होते म्हणून या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान मिळाले, अन्यथा काय परिस्थिती झाली असती याचा विचार केला तरी भयग्रस्त व्हायला होते. आप्पांनी स्थापन केलेले कृष्णा हॉस्पिटल केवळ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू करून गप्प बसले नाही, तर कोरोनाच्या लढाईत हिरिरीने भाग घेत अनेक जागतिक स्तरावरील उपक्रमात भागीदारीही केली. सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम ''''कोविड-१९'''' ची चाचणी करण्यास येथेच प्रारंभ झाला. कोरोना लस संशोधन प्रकल्पातही कृष्णा हॉस्पिटलने सहभाग घेतला. कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी तयार केली. प्लाझ्मा थेरपीस प्रारंभही जिल्ह्यात सर्वप्रथम येथेच सुरू झाला.
सहकार, शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसिंचन अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आप्पासाहेबांना ५ ऑगस्ट २०१३ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी देवाज्ञा झाली आणि अखंड कृष्णाकाठ पोरका झाला. अनेकांचे कुटुंब उभे करणाऱ्या आप्पासाहेबांच्या जाण्यामुळे अनेक कुटुंबांत आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचे छत्र हरविल्याची भावना निर्माण झाली; पण त्यावेळी आप्पासाहेबांच्या थोर कार्याचा वसा आणि वारसा स्वीकारलेले त्यांचे पुत्र तथा कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा), नातू तथा कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले (बाबा) आणि श्री. विनायक भोसले (बाबा) यांनी आप्पांनी घालून दिलेल्या पाऊलवाटेवरून चालत, लोकांच्या जीवनात पुन्हा एकदा स्थैर्य आणले आहे. आज आप्पासाहेब नसले तरी त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कार्यातून ते आजही प्रत्येकाच्या मनामनात, हृदयात जिवंत आहेत, अमर आहेत.
- सुशील लाड, प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी,
कृष्णा अभिमत विद्यापीठ, कऱ्हाड
फोटो - जयवंतराव भोसले