सतीश पाटील ।बुधगाव : संकटकाळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे, हे खऱ्या माणुसकीचे गुणवैशिष्ट्य असते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानंतर, ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड)च्या मानवलोक संस्थेला या गुणवैशिष्ट्यानेच येथे खेचून आणले. सलग बारा दिवसांपासून या संस्थेचे मदतकार्य सुरु आहे.
सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, माळवाडी, भिलवडी, चोपडेवाडी, बोरबन, सुखवाडी, मौजे डिग्रज, पद्माळे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी आणि राजापूरवाडी इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. संस्थेने तीन जेसीबींच्या मदतीने तब्बल बारा दिवस अहोरात्र स्वच्छतेचे काम केले.
सांगली जिल्ह्यातील दहा गावांमध्ये, तर कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पूरग्रस्तांना ह्यकम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नदान केले. सुमारे १५ हजार लोकांना त्याचा लाभ झाला. गाळाने भरलेले रस्ते जेसीबीच्या मदतीने साफ करण्याबरोबरच सुमारे ३० मृत जनावरांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. १२ आॅगस्ट ते २१ आॅगस्टअखेर दहा दिवस हे काम चालले. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते.
मानवलोकण ही संस्था १९८२ मध्ये डॉ. द्वारकादास लोहिया या ध्येयवेड्या माणसाने अंबाजोगाईत सुरु केली. ही संस्था नावारुपास आली, ती १९९३ च्या किल्लारी भूकंपावेळी. मानवलोकणचे कार्यकर्ते त्यावेळीही किल्लारीत पोहोचले होते. संस्थेच्या या मदतकार्याबद्दल युनिसेफच्या अधिकारी पथकाने तसेच गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी संस्थेला कौतुकाची थाप दिली आहे.