अंकलखोप : ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये एक प्रकारचा जिव्हाळा असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातच खरे वाङ्मय दिसून येते, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सदानंद साहित्य मंडळाच्या औदुंबर येथील ७२ व्या साहित्य संमेलनात केले. ते अध्यक्षस्थानी होते. चपळगावकर म्हणाले की, जात्यावरची गीते संपली, कारण आता घरा-घरात जाती राहिलीच नाहीत. त्यामुळे जीवनाचे संगीतच संपून गेले आहे. जीवनात विसंगत गोष्टीच समोर येत आहेत. देशातील विस्मृतीत गेलेल्या व्यक्ती पुढे याव्यात यासाठी लेखकांचे लेखन झाले पाहिजे. माणसाचे चारित्र्य घटनांतून जन्माला येते. ते पुढे मांडण्यासाठीच वाङ्मयाचा उद्देश असला पाहिजे.यावेळी त्यांनी जुने कवी, लेखकांचा परामर्श घेऊन त्यामध्ये किती ताकद होती याची उदाहरणे दिली. माणसाच्या मनातील चांगुलपणा वाङ्मयामध्ये मिळतो. त्यातच जीवनाचा अर्थ कळतो त्यासाठी वाङ्मय समृध्द झाले पाहिजे.यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे भाषण झाले. सुरुवातीस सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दयानंद पाडलोस्कर यांच्या ‘जन्म दिलेल्या मुलाकडे पाहात’ या काव्यसंग्रहाला सुधांशू पुरस्कार, तर तुषार कुलकर्णी यांच्या ‘ठिपका’ या काव्यसंग्रहाला सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी हरिभाऊ पुदाले यांच्या ‘गीत मयुरा’ या काव्यसंग्रहाचे व डॉ. उमेश दत्ता कळेकर, शिरोळ यांच्या ‘फिनिक्स’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.माजी कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे व शेतीनिष्ठ शेतकरी रवी पाटील व प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बापूसाहेब पुजारी, अविनाश सप्रे, श्रीनिवास कुलकर्णी, डॉ. सुधीर रसाळ, कवी वसंत पाटील, उपसरपंच सौ. श्वेता बिरनाळे, उपसरपंच विकास गावडे, रवी पाटील, प्रशांत पाटील, बाळासाहेब पवार, सौ. वैशाली पाटील, पत्रकार वसंत आपटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वासुदेव जोशी यांनी केले. चपळगावकर यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन माजी कुलगुरु द. ना. धनागरे यांचा सत्कार केला.(वार्ताहर)कविसंमेलनात उत्साह औदुंबरच्या साहित्य संमेलनाने अनेक नवोदितांना लिहिते व बोलते केले आहे, असे प्रतिपादन कवी वसंत पाटील (पणुंब्रे वारुण) यांनी कविसंमेलनात केले. ‘कवी सुधांशू व्यासपीठा’वर सलग तीन तास कविसंमेलन रंगले होते. कवींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. सुभाष कवडे यांनी केले. आभार आदित्य जोशी यांनी मानले.
ग्रामीण भागातच खरे वाङ्मय
By admin | Published: January 15, 2015 10:44 PM