सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करताना भाजपविरोधात शड्डू ठोकला.सांगलीत रविवारी सिद्धरामय्या यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला. या मेळाव्यात आ. विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या नेत्यांनी जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांना वाचा फोडली. सीमाभागातील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न, महापुराच्या काळात अलमट्टी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन, कर्नाटकातील मराठी बांधवांची सुरक्षा अशा प्रश्नांबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी कार्यक्रमाच्या निमित्ताने खुली चर्चा करण्यात आली.विश्वजित कदम म्हणाले की, सीमाभागातील मराठी भाषिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होत असल्याने अलमट्टी धरणातून पुराच्या काळात पाणी आवश्यक त्या प्रमाणात सोडण्याचे नियोजन करावे. जत तालुक्यातील दुष्काळी भागास तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याबाबतही धोरणात्मक निर्णय घ्यावा.विशाल पाटील म्हणाले की, भाजपचे खासदार संजय पाटील हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हणून आले, पण ते स्वतःची मालमत्ता दुप्पट करण्यात गुंतलेले असतात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या ताकदीवर भाजपला या मतदारसंघात पराभूत करू.
विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्वमेळाव्यात काँग्रेसचे विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्याचे नेतृत्व विश्वजित कदम यांनी करावे, आम्ही त्यांना साथ देऊ. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही कदम यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील पुढील सर्व निवडणुका लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
तीन ‘वि’ इतिहास घडविणारविश्वजित कदम, विशाल पाटील व विक्रम सावंत अशा तीन ‘वि’कडून जिल्ह्यात भविष्यात इतिहास घडविला जाईल, असे विश्वास पाटील यांनी सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत प्रतिसाद दिला.
आग्रह कडेगावचा, पण निवडली सांगलीविश्वजित कदम म्हणाले की, हा मेळावा कडेगावमध्ये घेण्याचा अनेकांचा आग्रह होता. पण, मी सांगलीला हा मेळावा घेतला. आता केवळ पलूस-कडेगाव मतदारसंघच नव्हे, तर मला जिल्हा जिंकायचा आहे. त्यासाठीच ही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.