सांगली : मराठी जनमानसाला रंगभूमीची ओळख करून देणाºया सांगलीला नाट्यसंमेलनांच्या शताब्दी सोहळ्याचा बहुमान मिळाला आहे. तो भव्यदिव्य, कल्पक आणि संस्मरणीय होईल, यासाठी सांगलीतील रंगकर्मींचे प्रयत्न आहेत. मार्चमध्ये शताब्दी सोहळ्याचा प्रारंभ सांगलीतून होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक बुधवारी मुंबईत झाली. त्यावेळी सांगलीतून श्रीनिवास जरंडीकर, मुकुंद पटवर्धन व इस्लामपुरातून संदीप पाटील हे नाट्य परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत सोहळ्याचा प्राथमिक आराखडा निश्चित करण्यात आला. तंजावरमध्ये व्यंकोजीराजे यांनी दक्षिणी-मराठी भाषेत मराठी नाटकांच्या १९ संहितांचे लेखन केले होते. या पार्श्वभूमीवर २५ मार्चरोजी तेथे उपक्रमांचा प्रारंभ होईल.शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे मुख्य कार्यक्रम सांगलीत २७ ते २९ मार्च असे तीन दिवस होतील.
नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे विद्यमान अध्यक्ष प्रेमानंद गज्वी अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. डॉ. पटेल यांचे बीजभाषणही होईल. तत्पूर्वी २५ मार्चला गुढीपाडव्यादिवशी विष्णुदास भावे यांना अभिवादनाचा कार्यक्रम होईल. २६ मार्चला गज्वी व पटेल यांच्यासह अनेक दिग्गज रंगकर्मींच्या सहभागाने नाट्यदिंडी निघेल.
सोहळ्यादरम्यान विष्णुदास भावे यांच्या ‘संगीत सीता स्वयंवर’ या संगीतनाटकाचा प्रयोग होईल. आजवरच्या ९९ संमेलनांचा प्रवास दाखविणारी कलाकृती नागपूरमधील संमेलनात तेथील रंगकर्मींनी सादर केली होती. सांगलीतील सोहळ्यातही तिचा समावेश असेल.
सांगलीनंतर राज्यभरात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत. त्यामुळे तेथील रंगकर्मींचे लक्ष सांगलीकरांच्या कलाकृतींकडे असेल. परिणामी येथील संयोजकांवर मोठी जबाबदारी आहे.