सांगली : हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी नवीन हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापुरी हळदीची ४९७ क्विंटल, तर परपेठ हळदीची ११७ क्विंटल आवक झाली. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळद प्रतिक्विंटल ३१ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाला. सरासरी १५ हजार रुपये क्विंटल भाव राहिला. पहिल्या दिवशी दोन हजार २२८ पोती विक्रीसाठी आली होती.सांगली मार्केट यार्डात नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील व बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. मुहूर्ताचे नवीन हळद सौदे शुभारंभाला गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सोसायटी येथून सुरुवात झाली. प्रथम हळद शेतीमाल पोत्यांचे पूजन करण्यात आले. राजेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला उच्चांकी ३१ हजारा रुपये क्विंटल दर मिळाला.यावेळी उपसभापती रावसाहेब पाटील संचालक संग्राम पाटील, बापूसो बुरसे, स्वप्निल शिंदे, काडाप्पा वारद, बिराप्पा शिंदे. शकुंतला बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील, मारुती बंडगर, बाजार समिती सचिव महेश चव्हाण, उपसचिव नितीन कोळसे, चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा, दिलीप आरवाडे, मनोहर सारडा, व्यापारी, शेतकरी, हमाल उपस्थित होते.
असे आहेत राजापुरी हळदीचे दर (प्रतिक्विंटल)
- किमान १०,५००
- कमाल ३१,०००
- सरासरी २०,७५०
- परपेठ हळदीचे दर
- किमान ८६००
- कमाल १३,०००
- सरासरी १०,८००
सांगलीच्या बाजारपेठेवर शेतकऱ्यांचा विश्वास : जयश्री पाटीलजिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील म्हणाल्या, सांगली बाजार समितीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. हळद, बेदाणा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. म्हणूनच परराज्यातील शेतकऱ्यांकडूनही आपला शेतीमाल सांगलीत आणला जात आहे.