आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आष्टा येथील उपबाजारात रविवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हळद सौदे सुरू होणार आहेत, अशी माहिती सभापती अल्लाउद्दीन चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, आष्टा परिसरातील आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, बागणी, शिगाव, वाळवा, गोटखिंडी, इस्लामपूर परिसरात हजारो एकर हळदीचे पीक घेतले जाते. येथील हळद उच्च दर्जाची असल्याने या हळदीला चांगली मागणी आहे. माजी आमदार विलासराव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून आष्टा येथील उपबाजारात हळदीचे सौदे सुरू झाले.
पहिल्याचवर्षी सुमारे १५ हजार पोती हळद विक्रीसाठी झाली. २०१६ पासून प्रतिवर्षी यामध्ये वाढ होत आहे. आष्टा येथील हळद बाजारात हळद आणल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत होत आहे. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक सौदे होत आहेत. रविवारी बाजार समितीचे सदस्य, शेतकरी, अडते व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हळद सौदे सुरू होणार आहेत. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हळद घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन चौगुले यांनी केले
चौकट
केळीचे सौदे सुरू होणार
आष्टा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने हळद उपबाजार सुरू झाला. त्याचप्रमाणे केळीचे सौदे सुरू होणार आहेत. यासाठी सभापती अल्लाउद्दीन चौगुले व सहकारी यांनी आटपाडी, अकलूज, पंढरपूर येथील बाजाराची प्रत्यक्ष पाहणी करून खरेदी-विक्रीबाबत अभ्यास केला आहे. वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावात पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे. युवा नेते प्रतीक पाटील यांनी मेळावाही घेतला आहेत. त्यामुळे लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते केळीचे सौदे सुरू करण्यात येणार आहेत.