अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अतिवृष्टी व महापुराचा सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील काही भागातील हळदीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या भागातून पुढील हंगामासाठी येणाऱ्या राजापुरी हळदीमध्ये अंदाजे तीन लाख पोती आवक घटण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यासह राज्याच्या अन्य भागातील हळदीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
भारतात दरवर्षी ९ ते १० लाख टन हळदीचे उत्पादन होते. एप्रिलच्या मध्यापासून जूनअखेर हळदीची लागवड केली जाते. यंदाही पाऊस वेळेत आल्यामुळे पेरण्या वेळेत झाल्या होत्या, मात्र महाराष्ट्रात जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टीने या पिकांना मोठा दणका दिला आहे. विशेषत: सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील महापुरामुळे पेरणी केलेल्या क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. कर्नाटकातील अथणी, गोकाक आदी भागातील पिकांचेही नुकसान झाले आहे.
पिकाच्या नुकसानामुळे सांगलीच्या बाजारात येणाऱ्या राजापुरी हळदीच्या आवकेत आगामी हंगामात सुमारे २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांतून दरवर्षी समुारे साडेतीन ते चार लाख हळद पोती (५० किलोची) आवक सांगलीच्या मार्केट यार्डात होत असते. कर्नाटकातून सुमारे ८ लाख पोत्यांची आवक होते. कर्नाटकातील एकूण आवकेत पाऊण लाख ते एक लाख पोती तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील आवकेत दीड लाख पोत्यांची आवक घटण्याची चिन्हे आहेत.
पुढील हंगामावर या नुकसानाचा परिणाम होणार आहे. आवक घटल्यामुळे दरांमधील तेजी कायम राहण्याचीही शक्यता आहे. हळदीची मागणी गेल्या दोन वर्षांपासून कायम आहे. निर्यातीतही वाढ होत आहे.
कोट
दीड एकरावरील हळदीचे पीक पाण्यात आहे. महापुरामुळे आता तितक्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. पीक उगवण झाली तरी उतारा घटत असल्याने त्याचा फायदा होत नाही.
-विकास बाबर, हळद उत्पादक, भिलवडी
कोट
अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटकातील काही भागातील हळदीचे पीक पाण्याखाली गेले आहे. नुकसान किती झाले, याचा अंदाज अद्याप नसला तरी सुमारे अडीच लाख पोती राजापुरी हळदीची आवक पुढील हंगामात घटण्याची शक्यता आहे.
- मनोहरलाल सारडा, हळद व्यापारी, माजी अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली