प्रताप महाडिक/ऑनलाइन लोकमत सांगली, दि. 23 - जिल्ह्यात सर्वत्र हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने हळदीला अल्प दर दिला जात आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदामे, शीतगृहे, तसेच खासगी गोदामात सुमारे साडेतीन लाख क्विंटल जुनी हळद शिल्लक आहे. आता यंदा सांगलीच्या बाजारपेठेत १० ते १२ लाख क्विं टल हळदीची आवक होण्याची शक्यता आहे. जुन्या हळदीचे दरही गडगडलेले असतानाच आवक वाढल्याने नव्या हळदीचे दरही घसरण्याची शक्यता आहे. सांगलीच्या बाजारपेठेत मागीलवर्षी आडेआठ लाख क्विं टल हळदीची आवक झाली होती. यंदा चांगला पाऊस आणि हवामानामुळे उत्पादनात वाढ झाली. सांगलीत सातारा, हिंगोली, नांदेड, जळगाव जिल्ह्यांसह कर्नाटक, सेलम, निजामाबाद येथून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते.हळदीसाठी एकरी दीड लाख रुपये उत्पादन खर्च होतो. सरासरी उत्पन्न एकरी १५ ते २० क्विं टल आहे. उत्पादन खर्चाबरोबरच वाहतूक, हमाली व तोलाई आदी खर्च विचारात घेतल्यास, प्रतिक्विं टल १० ते १२ हजार रुपये दर मिळाला तरी, हळद उत्पादकांना तोटाच सहन करावा लागतो. तुटपुंज्या भांडवलामध्ये हळदीसारखे उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे होत आहे. विकास सोसायट्या हळदीसाठी ३० ते ३५ हजार रुपये कर्ज देत असल्या तरी, खासगी सावकाराकडून कर्ज काढून, दागिने गहाण ठेवूनच हळद पिकवावी लागते. बाजारपेठेच्या दरासोबत नेहमीच संघर्ष करावा लागतो. यावर्षी २६ जानेवारीनंतर सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळद येणार आहे. प्रारंभीच्या सौद्याला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.हळदीला रामराम गेल्या अनेक वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी निराश होऊन चालूवर्षी बियाणांसहीत हळद शिजवली आहे. हे शेतकरी आता कंटाळून हळदीला कायमचा रामराम ठोकून अन्य पिके घेण्याच्या विचारात आहेत.निर्यातीवर निर्बंध नाहीतहळद निर्यातीवर सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. तरीही हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. हळदीचे औषधी व आयुर्वेदिक महत्त्व अधिक आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यात लक्ष घातले, तर निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरवर्षी देशातील मागणी आणि परदेशात निर्यात होणारी हळद, असे ६० लाख क्विं टल हळदीचे उत्पन्न पुरेसे आहे, परंतु देशात ८० ते ८५ लाख क्विं टल हळदीचे उत्पन्न होत आहे. विक्री होणाऱ्या हळदीपेक्षा उत्पन्न वाढल्याने हळदीचे दर घसरत आहेत.- राजू मेनकर, हळद व्यापारी, सांगलीसोन्यासारखी पिवळी धमक असणाऱ्या हळदीचा रंग फिका पडू लागला आहे. पूर्वी सोन्याच्या बरोबरीने असणाऱ्या हळदीचे दर गेल्या चार वर्षात घसरलेलेच आहेत. हळद उत्पादकांना उत्पादन खर्चाइतकीही रक्कम हातात मिळत नाही. दर घसरल्याने आता कित्त्येक शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरविली आहे.- राहुल पाटील, हळद उत्पादक, चिंचणी, ता. कडेगाव