आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील वादग्रस्त प्रकाश स्टोन क्रशर बंद करून चुकीचा चौकशी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आटपाडी तालुका मनसेच्या वतीने अप्पर तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे निवेदनाने करण्यात आली आहे.
प्रकाश स्टोन क्रशरबाबत स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांनी प्रशासनास निवेदन देत स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र आजअखेर कारवाई झालेली नाही. मनसेच्या वतीने यापूर्वी आंदोलन करत परवाना नसताना स्टोन क्रशर चालू ठेवल्याबाबत प्रशासनास निदर्शनास आणून देत सील करण्यात आले होते. खाणपट्टाबाबत माहिती मागविली असता आणपट्टाव्यतिरिक्त खाणकाम केल्याचे आढळून आले आहे. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. शासनाने स्टोन क्रशरला पाच कोटी ५४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड केला आहे. तोही बुडवला आहे. जवळच लोकवस्ती असताना क्रशरला अनधिकृत परवानगी दिली आहे. प्रकाश स्टोन क्रशरच्याच हद्दीमध्ये नव्याने राजपथ कंपनीच्या क्रशर चालवला जात असून त्याच्या बोअर ब्लास्टिंगने एक किलोमीटर अंतरावरील अनेक घरांना तडे गेले आहेत.
याबाबत मनसेने निवेदन देत कारवाई करावी व संयुक्त चौकशी करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, जिल्हा सचिव राजेश जाधव, तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्रकाश गायकवाड, मारुती खिलारी, मनीषा खांडेकर उपस्थित होते.
दोन अहवालाचे गौडबंगाल काय?
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रकाश स्टोन क्रशर बनपुरी-करगणी-चिंचघाट रस्त्यापासून फक्त २५.६० मीटरवर असल्याचे सांगून नाहरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. मात्र दि. १८ मार्चला स्टोन क्रशर रस्त्यापासून २०० मीटरवर असल्याचे दाखवत नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. एकच खाण मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या दोन अहवालाचे गौडबंगाल नेमके काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.