शिराळा : ही निवडणूक दोन पक्षातील नसून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेच्या विचारांची आहे. पूरपरिस्थितीत महत्त्वाची भूमिका असताना हेलिकॉप्टरमधून पाहणी करणारे मुख्यमंत्री निवडणुकीतील मते मागण्यासाठी पायी फिरत आहेत. राज्यातील आणि देशातील सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातल्या विकासावर बोलण्यासारखे काही नसल्यामुळे, देशाचे प्रश्न राज्यात घेऊन ते मांडत आहेत. २०१४ मध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या काही नेत्यांनी आणि आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी पुंगी वाजवली; कमळ फुलले. मात्र त्यांना नागपंचमी उत्सव सुरू करता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले भाजप सरकार हॉटेलसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे काम करत आहे.जयंत पाटील म्हणाले, गेल्यावेळी वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील मतांचा वाटा कमी पडला. यावेळी मात्र याची चिंता तुम्ही करू नका. सध्या सुरू असणारे वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम मतासाठी सुरू असून, या योजनेचा पाया फत्तेसिंगराव नाईक यांनी घातला आणि मानसिंगराव नाईक यांनी त्याला गती देण्याचे काम केले आहे, हे सर्वांना माहीत आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, विकासाच्या मुद्यावर या निवडणुकीत माझा विजय निश्चित असून, मी अर्ज भरला त्याच दिवशी निकाल काय लागणार हे चित्र स्पष्ट झाले आहे.विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील, राजीव पाटील, राजश्री गोसावी, बी. के. नायकवडी, मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत, रवींद्र बर्डे, साधना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, देवराज पाटील, रणजित पाटील, आनंदराव पाटील, संदीप जाधव, भीमराव गायकवाड, दिनकरराव पाटील, राजेंद्र नाईक, सुरेश चव्हाण, भाऊसाहेब नाईक, देवेंद्र धस, कीर्तिकुमार पाटील, सुनीता निकम, वंदना यादव, रुपाली भोसले यावेळी उपस्थित होते. सुनंदा सोनटक्के यांनी आभार मानले.
पुरावेळी हेलिकॉप्टरमधून फिरणारे मते मागण्यासाठी पायी फिरताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:40 PM