दिलीप कुंभार -- नरवाड -मिरज पूर्व भागातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांना किरकोळ व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आर्थिक फटका बसत आहे. मिरज तालुक्यातील नरवाड, मालगाव, बेडग, आरग आदी भागातून मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, पंढरपूर, उस्मानाबाद, राजकोट (गुजरात) या बाजारात विक्रीसाठी खाऊची पाने पाठविली जातात. तेथील घाऊक आणि किरकोळ व्यापारी पाने खरेदी करून विक्रीसाठी सर्वत्र वितरित केली जातात. मात्र सध्या चालू असलेल्या अडतप्रश्नी किरकोळ व्यापाऱ्यांच्या संपामुळे पान उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. पान बाजारात यापूर्वी ६०० ते ९०० रुपयाला विकली जाणारी दहा कवळीची ‘कळी’ (तीन हजार पानांची एक करंडी) बंदमुळे २०० ते ३०० रुपयाला विकली जात आहे. परिणामी पान उत्पादकांनी कमी प्रमाणात पानांचा खुडा सुरू ठेवला आहे. यामुळे उत्पादकास आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पान बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने याचा थेट परिणाम झाला आहे. घाऊक पान दलालांनी मात्र याचा फायदा उठविला असून, कमी दरात चांगला माल मिळत आहे. फापडा पाने भट्टीला लावून, ती पिकवून मुंबईच्या पान बाजारात विकली जात असल्याने सध्या या पानांना चांगला भाव मिळत आहे. त्यावर बंदचा फारसा परिणाम झाला नाही.शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एम. के. माळी म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने त्वरित धोरणात बदल करून अडतप्रश्नी तोडगा काढला पाहिजे. किरकोळ व्यापाऱ्यांचा जेवढा संप लांबेल तेवढा आर्थिक फटका पान उत्पादकांना सोसावा लागणार आहे. गेल्या दोन वर्षापासून पानांना दर मिळाला नाही. आता कुठे सुरुवात झाली, तेवढ्यात झालेल्या संपामुळे पान उत्पादकांचे कंबरडे मोडणार आहे.
बंदमुळे पान उत्पादक अडचणीत
By admin | Published: July 20, 2016 11:47 PM