सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याला मंगळवारी खरेदीचा अमाप उत्साह सांगलीत दिसून आला. दिवसात तब्बल ६५ कोटींची उलाढाल झाली असून, यावर्षी मोबाईलसह एसी (वातानुकूलित यंत्र), कुलर यांना सर्वाधिक मागणी होती. सोने खरेदीतही उत्साह दिसून आला. नोटाबंदीच्या कालावधीनंतरचा सर्वात मोठा सण म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे यावर्षीच्या खरेदीच्या उत्साहाबाबत व्यापाऱ्यांमध्ये साशंकता व्यक्त होत होती. तरीही सर्व अंदाज फोल ठरवित ग्राहकांनी खरेदीचा अमाप उत्साह दाखविला. त्यामुळे तब्बल ६५ कोटींच्या उलाढालीची गुढी मंगळवारी उभारली गेली. यामध्ये सर्वाधिक उलाढाल दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात झाली. त्याखालोखाल मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने यावेळी कुलर आणि एसी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आलेला आहे. विक्रेत्यांना ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. शहरातील विविध दुचाकी शोरूम्समधून मोठ्या प्रमाणावर पाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांचे वितरण करण्यात आले. पंधरा दिवस अगोदर बुकिंगची प्रक्रिया सुरू होती. दुचाकींच्या शोरूम्समधून सुमारे २०० कोटींची उलाढाल झाली आहे. चारचाकीलाही लोकांनी पसंती दर्शविली. विविध कंपन्यांच्या कारना असलेल्या कर्जपुरवठ्याच्या योजनेमुळे ग्राहकांनी मुहूर्तावर वाहन खरेदी केले. सुयोग राजेंद्र डिजिटलचे विजय लड्डा यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये यावेळी कुलर आणि एसीला मागणी अधिक दिसून आली. त्याखालोखाल मोबाईलची उलाढाल झाली. मोबाईलमध्ये रॅम आणि रॉम अधिक असणारे मोबाईल आणि विशेषत: सेल्फीच्या सर्वाधिक पिक्सेलचा कॅमेरा असलेल्या मोबाईलला सर्वाधिक पसंती मिळाली. ग्राहकांचा फायनान्स योजनेकडे जादा ओढा असल्याचे दिसून आले. गतवर्षाच्या तुलनेत यंदा उत्साह अधिक दिसून आला. चौगुले इंडस्ट्रीजचे सिनियर सेल्स मॅनेजर नीलेश पोतदार यांनी सांगितले की, गतवर्षाच्या तुलनेत ग्राहकांचा उत्साह अधिक दिसून आला. चारचाकींना मोठी मागणी होती. सांगलीमधील दोन शोरूम्समधून जवळपास १७५ चारचाकींची डिलिव्हरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली आहे. महाराष्ट्र अॅग्रो अॅण्ड अॅटो सेल्सच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरलाही यंदा दुप्पट मागणी वाढली होती. मुहूर्तावर ही वाहन नेण्यासाठी बुकिंग करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
सांगलीत ६५ कोटींच्या उलाढालीची गुढी
By admin | Published: March 29, 2017 1:07 AM