सांगली : आफ्रिका खंडातील सर्वोच्च व जगातील सर्वात उंच एकल पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किलीमांजारो शिखरावर सांगलीच्या गिर्यारोहकाने अनोखी शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या मूर्तीसह शिखर सर करून पंचवीस फुटी भगवा ध्वज फडकवत मानवंदना दिली.शिवजयंतीचे औचित्य साधून सांगलीतील तरुण गिर्यारोहक तुषार सुभेदार याने १९ हजार ३४१ फूट उंचावर असलेला माउंट किलीमांजारो सर केले. टांझानिया व केनिया या देशांच्या सीमेवर हा पर्वत आहे. महाराष्ट्राचे व देशाचे लाडके दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्याचा निश्चय सुभेदार याने केला होता. त्यामुळे त्याने किलीमांजारो शिखर निवडले.
या मोहिमेत शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शिखरावर नेऊन २५ फ़ूट लांब भगवा ध्वज फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरील सात रंगांची मातीही शिखरावर नेऊन महाराजांना अनोखी मानवंदना दिली.असंख्य अडथळे आणि अडचणी पार करत तुषारने शिखर सर केले. सतत बदलते वातावरण, उणे १५ ते २० तापमान यास तोंड देत त्याने मोहीम फत्ते केली. तुषारने सात महाद्वीपामधील पहिले शिखर सर केले असून उर्वरित सर्वात उंच सहा शिखरे सर करण्याचा त्याचा मानस आहे.