तासगाव : महाराष्ट्र बारव मोहीम दुर्ग वेध मित्रपरिवाराने आजवर १७०० हून अधिक विहीर, बारव, कुंड, पुष्करणी, बावडी, घोडबाव यांचे मॅपिंग केले आहे. त्यांचा इतिहास समाजासमोर आणला आहे. त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लवकरच भरवले जाणार आहे. यामध्ये तासगाव येथे सर्कससिंह परशुराम माळी यांच्या ऐतिहासिक विहिरीचाही समावेश आहे.बारव संशोधन मोहिमेचे सदस्य महेश मदने यांनी ही माहिती दिली. तासगावमध्ये सांगली रस्त्यावरील माळी मळ्यातील बारवदेखील अभ्यास करण्याजोगी असल्याचे ते म्हणाले. मोहिमेतर्फे तिच्या विविध पैलूंचा अभ्यास नुकताच करण्यात आला. सर्कससिंह उपाधी मिळालेले परशुरामभाऊ माळी यांच्या मळ्यात ती आहे. अंदाजे सव्वादोनशे वर्षांची बारव नियमित वापरामुळे आजही सुस्थितीत व स्वच्छ आहे. मिरज ते बेडग रस्त्यावरही अशीच समकालीन विहीर आहे.तासगावमधील बारव अत्यंत मजबूत बांधकाम शैलीची व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. एकाच वेळी तीन मोटा चालवल्या जायच्या. प्रशस्त प्रवेशद्वार, डाव्या बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या, त्याच्या वरील बाजूस दोन कोनाडे अशी रचना आहे. अंदाजे ८० ते ९० फूट खोली आहे. उजव्या बाजूला मोठ्या कोनाड्यात इंजिनघर आहे. विहिरीतील जिवंत झरे कायम राहण्यासाठी त्यांना पितळी बेंड बसवून पाणी बाहेर काढले आहे. परिसरातील १० एकरहून अधिक शेतीला ती आजमितीस पाणी पुरवत आहे.शाम माळी यांनी सांगितले की, सर्कससिंह परशुरामभाऊ माळी यांच्या बऱ्याच आठवणी या विहिरीशी निगडित आहेत. जंगली प्राण्यांवर प्रभुत्व मिळवलेल्या परशुरामभाऊ यांनी मोट ओढण्यासाठी वाघ-सिंहांना जुंपल्याचे सांगितले जाते.
कवठेएकंदची बारव केदारविजय ग्रंथात
राज्यभरातील अशा १७०० हून अधिक बारव प्रदर्शनातून समाजासमोर आणल्या जाणार आहेत. केदारविजय ग्रंथात उल्लेख असलेली कवठेएकंद येथील पुष्करणी, तासगावच्या ढवळवेसमधील शिवलिंगाच्या आकारातील बारव, सांगलीत विजयनगरमधील कुंभार मळ्यातील किल्लीच्या आकाराची बारव, मिरजेत सांगलीकर मळ्यातील गणपती मंदिराशेजारील पटवर्धन सरकारांची बारव आदींना प्रदर्शनातून समाजासमोर आणले जाणार आहे. या मोहिमेत मधुकर हाक्के, रोहन कोळी, हेमंत बेले, शिवानंद धुमाळ, सत्त्वशील कोळी, शैलेश मोरे, अशोक शिरोटे, शफिक मुतवल्ली, शाम गोसराडे, अधिक कोष्टी आदींनी सहभाग घेतला आहे.