सांगली आणि तासगावमध्ये बेदाण्याची वर्षाला दीड हजार कोटींची उलाढाल होते. बेदाण्याचे बहुतांशी व्यवहार हे व्यापारी, अडते आणि शेतकरी यांच्या विश्वासावरच होत आहेत. दरवर्षी उधारीवर दिलेल्या बेदाणा सौद्याच्या झिरो पेमेंटसाठी दिवाळीच्या दरम्यान सौदे बंद ठेवले जात आहेत. या कालावधित बेदाणा व्यापाऱ्यांनी अडते, शेतकऱ्यांचे सर्व पैसे देण्याची गरज आहे. जोपर्यंत व्यापारी पैसे देत नाहीत, तोपर्यंत बेदाणा सौद्यात त्यांना सहभागी होता येत नाही. यावर्षीची अडते, शेतकरी यांचे थकीत पैसे देण्याची मुदत संपूनही सात व्यापाऱ्यांनी ५० लाख रुपये अडत्यांना दिले नाहीत. अठरा व्यापाऱ्यांकडे साडेतीन कोटी रुपये अडत्यांचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून थकीत आहेत. ते व्यापारी बेदाणा असोसिएशनचे सभासदही नाहीत आणि सौद्यातही सहभागी नाहीत, असे बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.
दरम्यान, बेदाणा असोसिएशनच्या सभासदांच्या माहितीनुसार, यावर्षीच २५ व्यापाऱ्यांकडे दोन ते तीन कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये काही असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. म्हणूनच थकीत बेदाणा व्यापाऱ्यांची नावे प्रसिध्द केली जात नाहीत, असा आरोपही काही सभासदांनी केला आहे.
चौकट
व्हॉट्स ॲपवर कलगीतुरा
व्हॉट्स ॲपवर काही सभासदांनी बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना थकीत व्यापाऱ्यांची नावे प्रसिध्द करण्याचा निर्णय होऊनही ती का केली नाहीत, असा सवाल सभासदांनी केला आहे. यावर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची बदनामी नको, म्हणूनच प्रसिध्द केली नाहीत, असा खुलासा केला आहे.
चौकट
तीन व्यापाऱ्यांनी २२ लाख भरले : राजेंद्र कुंभार
यावर्षी सात व्यापाऱ्यांकडे ५० लाख थकीत आहेत. थकबाकी असलेल्या सात व्यापाऱ्यांपैकी तीन व्यापाऱ्यांनी २२ लाख भरले आहेत. थकबाकीदारांमध्येही बेदाणा असोसिएशनचा पदाधिकारी कुणीही नाही, असा खुलासाही बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी केला आहे. तसेच उर्वरित थकबाकीदार व्यापारी हे दोन ते तीन वर्षातील असून त्यांच्याकडे तीन कोटी थकबाकी आहे. ते व्यापारी असोसिएशनचे सभासद नाहीत आणि सौद्यातही सध्या सहभागी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.