नरवाड : म्हैसाळ योजनेचे पाणी हवे असेल तर, गावाला जाणाऱ्या एका कालव्याद्वारे चोवीस तास पाणी सोडण्यासाठी ५१ हजार रुपये भरावे लागतील, असा प्रस्ताव पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. नरवाड (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून तो प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे मंगळवारी पाणी वाटपासाठी झालेली बैठक निष्फळ ठरली आहे.नरवाड येथे पाणी वाटपाचे नियोजन करण्यासाठी म्हैसाळ योजनेचे उपविभागीय पाटबंधारे अधिकारी एस. सी. हजारे आणि कनिष्ठ अभियंता दीपा होसमट यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक बोलाविली होती.
यामध्ये पाटबंधारे अधिकारी हजारे यांनी नरवाड गावाच्या एका कालव्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी सोडण्यासाठी २४ तासाला ५१ हजार रुपये भरावे लागतील, असा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला. अधिकाऱ्यांच्या या फॉर्म्युल्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला.
शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. एकरी पाणीपट्टी भरुन पाणी घेण्यास आमची तयारी असल्याचे यावेळी सांगितले. पोटकालव्याचे अस्तरीकरण अपूर्ण असल्याने जमिनीत पाणी मुरते याला कोण जबाबदार? असाही प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी विचारला. यावर उपविभागीय अधिकारी हजारे यांनी पाणी मागणी अर्ज भरुन देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.
बैठकीत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावर उपविभागीय अधिकारी हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एकरी पाणी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसारच पाणीपट्टी आकारणी करण्यात येईल, असे सांगितले.बैठकीस माजी उपसरपंच नंदकुमार कोल्हापुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, विश्वभूषण पाटील, रघू जाधव, शिवाजी माळी, अशोक माळी, शशिकांत शिंदे, तानाजी चव्हाण, तानाजी माळी, महादेव भेंडवडे, स्थापत्य अभियंता शैलेंद्र एडके, पर्यवेक्षक सिद्राम माने आदी उपस्थित होते.