सांगली : केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दर वाढणार असल्याची हूल उठवत रासायनिक खतांची कृत्रिम दरवाढ केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी खते महागली आहेत. त्याशिवाय डिझेल दरवाढीने मशागतही वीस ते तीस टक्क्यांनी महागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून डिझेल-पेट्रोलची नियमितपणे होणारी दरवाढदेखील या महागाईला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. एरवी पेरणीच्या हंगामात म्हणजे जून-जुलैमध्ये रासायनिक खतांची दरवाढ व साठेबाजी होते. लिंकिंगही केले जाते. हा अनुभव ऐन उन्हाळ्यात येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. डिझेलच्या दरवाढीने वाहतूक महागली आहे, त्याचा परिणाम रासायनिक खतांच्या दरवाढीत होत असल्याचे वितरक आणि विक्रेते सांगत आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर आता दरवाढ होणार असल्याच्या चर्चाही समाजमाध्यमातून पसरवल्या गेल्या आहेत, त्याचाही परिणाम दरवाढीवर झाला आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी साठेबाजी सुरू आहे.
सध्या उसाच्या भरणीसाठी तसेच उन्हाळी पिके, भाजीपाला यासाठी रासायनिक खतांना मागणी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांंना सरासरी २०० ते २५० रुपये प्रत्येक गोणीसाठी जादा मोजावे लागत आहेत. द्राक्षांच्या उन्हाळी छाटण्यांना खतांची गरज नसते, तरीही त्याचे दर वाढले आहेत. प्रत्येक गोणी सरासरी वीस टक्क्यांनी महागली आहे.
चौकट
डिझेल वाढल्यानेही शेती महागली
शेतीसाठी डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्याच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या खिशाला चाट बसू लागली आहे. इंधन दरवाढीचा थेट फटका शेतीच्या अर्थकारणाला बसला आहे.
चौकट
नांगरणी, सरी सोडणी महागली
सध्या पिके निघाल्याने शेते रिकामी आहेत. उन्हाळी मशागती सुरू झाल्या आहेत. त्यासाठी ट्रॅक्टर मालकांनी दरवाढ केली आहे. भाडेवाढ नको, फक्त डिझेलचे वाढलेले दर लक्षात घ्या, असे त्यांचे म्हणणे आहे. एक एकराची नांगरणी अडीच हजारांवर गेली आहे. कडबा व ज्वारीची वाहतूकही भाडेवाढीमुळे शेतकऱ्यांचा खिसा हलका करत आहे. ट्रॅक्टरच्या भाडेवाढीचा फायदा उठवत बैलांची मशागतही दहा ते वीस टक्क्यांनी महागली आहे. भाजीपाल्याच्या फडावर अैाषध फवारणीसाठी पेट्रोल पंप वापरला जातो, पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठल्याने फवारणीदेखील परवडेना झाली आहे. त्यातच भाजीपाल्याचा बाजारही मंदावल्याने खर्चाइतके उत्पन्नही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पॉईंटर्स
खताचे दर आधीचे दर आताचे दर
१०-२६-२६ १०४० १४००
१९-१९-१९ १०५० १२५०
१२-३२-१६ ११०० १२५०
२४-२४ १०५० १३००
कोट
सध्या उसासाठी डीएपीची गरज आहे. दुकानात साठा आहे, पण दर वाढल्याचे सांगितले जात आहे. गोणीमागे २०० रुपये जादा मोजावे लागत आहेत.
- सतीश बागल, शेतकरी
उन्हाळी भाजीपाल्यासाठी ठिबकमधून खते सोडायची आहेत. जानेवारीपेक्षा मार्चमध्ये खते महागल्याचा अनुभव येत आहे. भाजीपाल्याचे दर कोसळलेले असताना खतांचे दर मात्र वाढताहेत हे न परवडणारे आहे. उन्हाळ्यात मागणी नसतानाही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांची लूटमार आहे, त्यावर शासनाने कारवाई केली पाहिजे.
- पांडुरंग कोरबू, शेतकरी
ज्वारी व हरभरा काढल्याने रिकाम्या झालेल्या रानाची उन्हाळी नांगरट करायची आहे. त्यासाठी नेहमीचा ट्रॅक्टर मालक एकरी दोन-अडीचशे रुपये जादा वाढवून मागत आहे. डिझेलचे दर वाढल्याने जादा पैसे द्यावेच लागत आहेत. मशागत आणि खते एकाचवेळी वीस टक्क्यांपर्यंत महागल्याने शेती तोट्यात गेली आहे.
- माणिक कदम, शेतकरी.