तासगाव : तालुक्यातील सावळज ,मणेराजुरी येथील १२ द्राक्षशेतकर्यांची २४ लाखांची उधार द्राक्षे खरेदी करून पळाला आहे. याप्रकरणी कलकत्ता येथील व्यापारी एम. डी. सलीम याच्या विरोधात तासगाव पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
फसवणूक झालेल्या शेतकर्यांमध्ये सागर सुकुमार पैलवार, महिंद्र एकनाथ भोसले, अनिल पांडुरंग भोसले, शीतल ब्रम्हनाथ चव्हाण, बाबासो गोविंद भोसले, रणजित जगन्नाथ भोसले, संभाजी पांडुरंग यादव, अजित दगडू पवार, विशाल नामदेव पवार, संजय सुभाष पवार, दिपक तुकाराम चव्हाण व दादासो रामचंद्र पाटील यांचा समावेश आहे.
शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यापारी सलीम याने सावळज मणेराजुरी व तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून शेतकर्यांना जादा दराचे आमिष दाखवून उधारीवर खरेदी केली. खरेदीनंतर दोनच दिवसात तुमचे बिल रोख देतो असे सांगितले. सलीम हा माल प्रताप ट्रान्सपोर्ट शिरढोण व सांगोला येथून कलकत्ता येथे पाठवायचा. मात्र २ दिवसांचा वायदा संपल्यावर शेतकरयांनी त्याच्या मोबाईलवर फोन केल्यास तो फोन उचलत न्हवता. ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनीही तो व्यापारी फोन उचलत नसल्याचे सांगितले. या घटनेने आपली फसवणूक झाल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आले. शुक्रवारी रात्री उशिरा तासगाव पोलिसात या घटनेची नोंद न्हवती. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या सह शेतकरयांनी व्यापारी सलीम याच्या खात्यावरील व्यावहार थांबवण्याची मागणी केली आहे.