मिरज : मिरजेत वाॅनलेस रुग्णालयासमोरच भरधाव मोटारीच्या धडकेत दोन रुग्णवाहिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मिरज वाॅनलेस रुग्णालयासमोर दररोज दहा ते पंधरा रुग्णवाहिका थांबतात. बुधवारी मध्यरात्री सांगलीकडून आलेल्या आलिशान मोटारीने रस्त्याकडेला थांबलेल्या दोन रुग्णवाहिकांना जोराची धडक दिली. अपघातानंतर भरधाव मोटार रस्त्याकडेला विद्युत खांबाला धडकली. अपघातात रियाज इस्माईल शेख (वय ३८, रा. यशवंतनगर, सांगली), गणेश जयसिंग मोरे (३८, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) हे किरकोळ जखमी झाले. धडकेत दोन रुग्णवाहिकांचा चुराडा झाला. मोटारीत विजेचा खांब घुसला. मात्र मोटारीतील दोघेजण बचावले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मोकाट कुत्रे आडवे आल्याने मोटारीवरचा ताबा सुटून अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. वाॅनलेस रुग्णालय परिसर नेहमी गजबजलेला असतो. पंढरपूर-सोलापूरकडे जाणारा हा महामार्ग असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळेस हा अपघात घडल्याने अनर्थ टळला. याबाबत मिरज शहर पोलिसांत नोंद आहे.