सांगली : शहरातील सरगम कम्युनिकेशन या मोबाईल दुकानातील महिला कामगारानेच २ लाख ६४ हजार ६२३ रुपयांचे मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी सुलताना उर्फ हिना समीर मुलाणी (वय ३२, रा. शंभर फुटी रस्ता, पाकिजा मशिदीजवळ) हिच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना १८ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडली.
याबाबत सांगली शहर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी इरफान मुबारक तांबोळी (रा. पंचशील कॉलनी, सांगली) यांचे भागीदारीत आझाद चौक आणि बसस्थानक परिसरात सरगम कम्युनिकेशन नावाचे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात संशयित सुलताना मुलाणी कामाला आहे. तांबोळी यांना दुकानातील १ लाख ८४ हजार ६२३ रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाइल तसेच साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्टॉक रजिस्टरमध्ये नमूद केलेले मोबाइल आणि प्रत्यक्षातील स्टाॅकची खातरजमा केली असता, त्यामध्ये ऐंशी हजारांची तफावत आढळली. त्यामुळे त्यांनी संशयित सुलताना हिच्याविरोधात चोरी आणि फसवणुकीची फिर्याद दाखल केली. तसेच मुलाणी हिने हे मोबाईल शंभर फुटी परिसरातच राहणाऱ्या संशयित हाकीम नावाच्या व्यक्तीला विक्रीसाठी दिले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.