सांगली : विक्रीस बंदी असतानाही सुगंधी तंबाखू व गुटख्याचा विक्रीसाठी साठा तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. लाजम सिकंदर मुजावर (रा. शंभर फुटी रोड, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून दोन लाख ४० हजार रुपयांच्या सुगंधी तंबाखू, गुटख्याचा साठ्यासह वाहन असा सहा लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कडक कारवाईचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, बायपास रोडवरील एका गॅरेजसमोर लावलेल्या मोटारीत सुगंधी तंबाखू, गुटख्याचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने वाहनाच्या मालकाकडे चौकशी केली असता, सुगंधी तंबाखू व गुटख्याच्या विक्रीची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांनी केलेल्या तपासणीत एक लाख ८० हजार रुपये किमतीच्या सुगंधी तंबाखूचे ९०० पुडे, तर ६० हजार रुपये किमतीच्या गुटख्याचे ३०० पुडे आढळून आो. माल आणण्यासाठी वापरण्यात आलेली चार लाख रूपये किमतीची मोटारही जप्त करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुभाष सूर्यवंशी, सुधीर गोरे, इम्रान मुल्ला यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.