संतोष भिसेसांगली : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या सव्वादोन पट पाणी वाहून गेल्याचे निरिक्षण पाटबंधारे विभागाने नोंदविले आहे.सांगलीतील महापुराची रौद्रता स्पष्ट करणारी ही आकडेवारी आहे. २१ जुलैपासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा धुमाकूळ सुरु झाला. २३ जुलैरोजी ५० हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला. सांगलीत कृष्णेची ३९ फुटांवरील पाणीपातळी वेगाने वाढली.
२४ ते २६ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ३८ टीएमसी पाणी गेले. चांदोलीच्या क्षमतेपेक्षा साडेतीन टीएमसी जास्त पाणी गेल्याचे पाटबंधारेचे निरिक्षण आहे. १ जून ते २९ जुलै या दोन महिन्यांत कृष्णा, कोयना, पंचगंगा दुथडी भरुन वाहत होत्या. या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले.सांगलीत २१ ते २९ जुलै या महापूरकाळात आयर्विन पुलापासून ७४ टीएमसी पाणी पुढे गेले. या काळात राजापूर धरणातून १२७ टीएमसी पाणी कर्नाटकात गेले. कोयना धरणातून यावेळी सरासरी ३३ ते ४९ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात होते.२०१९ मध्ये गेले ३३० टीएमसी२०१९ च्या महापुरावेळी २५ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान ३३० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता २१२ टीएमसी आहे, त्याच्या दीडपटीहून अधिक पाणी कर्नाटकात गेले होते. यावर्षी ११८ टीएमसी जास्त वाहून गेले.दुष्काळी भागात पुरवठा अशक्यपावसाळ्यात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला देण्याचा उपाय सातत्याने सुचवला जातो, पण महापुराचे पाणी पूर्णत: उचलण्याइतपत सिंचन योजना सक्षम नाहीत हे लक्षात घेतले जात नाही. म्हैसाळ सिंचन योजना सलग तीन महिने सुरु ठेवली तरी फक्त ७ टीएमसी पाण्याचा उपसा शक्य होतो.