लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत कोल्हापूर रस्त्यावर खॉजा वसाहतीत नाल्यात पडून यासीन इस्माईल शेख या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
ख्वॉजा वसाहतीतून वाहणाऱ्या नाल्यालगतच अनेक घरे आहेत. या नाल्यात यापूर्वीही लहान मुले पडली होती; पण त्यांना वाचविण्यात यश आले हाेते. यासीनचे वडील इस्माईल शेख नाल्यापासून जवळच कुटुंबासह राहतात. त्यांचा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी या खुल्या नाल्याच्या शेजारी खेळताना यासीन नाल्यात पडला. हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. काही वेळाने त्याची चप्पल नाल्याच्या कडेला दिसल्याने स्थानिक तरुणांनी त्याचा शोध घेतला असता तो नाल्यात बुडाल्याचे दिसले. तरुणांनी तत्काळ यासीनला नाल्यातून बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ख्वॉजा वसाहतीमधील खुला असलेला नाला बंदिस्त करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून महापालिकेकडे प्रलंबित आहे. नाला बंदिस्त करण्यासाठी गेली १५ वर्षे स्थानिक नागरिक महापालिकेकडे मागणी करीत आहेत. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यासीनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घटनेची गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद झाली आहे.