सांगली : शहरातील सिद्धिविनायक पूरमनजीक रस्त्याने जाणाऱ्या तरुणास चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीनासह राहुल माने (रा.इदगाह मैदान, मिरज) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी नीलेश लक्ष्मण कोट्याळ (रा.दत्तनगर रोड, सांगली) याने फिर्यादी दिली होती. दरम्यान, लुटल्यानंतर या संशयितांनी शंभरफुटी रोडवरून बुलेटचीही चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, ती बुलेटही जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नीलेश हा दत्तनगर रोडवरील सिद्धिविनायक पुरममध्ये राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो आपल्या दुकानगाळ्यामध्ये झोेपण्यासाठी जात होता. याच वेळी दुचाकीवरून दोघे त्याच्याजवळ आले व त्यातील दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याने अचानक त्याच्या पोटाला चाकू लावला व त्याचा मोबाइल हिसकावून घेत संशयित पसार झाले होते. त्यानंतर, या संशयितांनी शंभरफुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या अपार्टमेंटमधून बुलेटची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.