लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडेगावमधील सराफी दुकान फोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. सुमित सिद्धेश्वर कोरे (वय २३, रा. उभी पेठ नाथगल्ली, विटा) व सौरभ मुकेश कांबळे (२०, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, सध्या रा. अंबक फाटा, कडेगाव) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याकडून ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी चोरी, घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले आहे. कडेगाव परिसरात हे पथक गस्तीवर असताना पथकातील संतोष गळवे यांना दोघे जण गावठी पिस्तूल घेऊन कडेगाव एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेत सुमित कोरे याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल मिळून आले. तसेच सखोल चौकशी केली असता कडेगाव येथील सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुलीही त्यांनी दिली. दोघांना कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.