कोकरूड : काळुंद्रे (ता. शिराळा) येथे चंदनाची झाडे तोडण्यास आलेले चोरटे कापलेल्या झाडासह दोन दुचाकी तेथेच सोडून गेल्याने वनविभागाने तोड केलेली झाडे आणि दुचाकी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळुंद्रे येथील विलास मारुती पाटील यांच्या घरामागे चंदनाची झाडे होती. ही माहिती चंदन तस्करी करणाऱ्या टोळीस मिळाली. रात्रीच्या सुमारास चोरटे चंदन चोरण्यास आले. चंदनाचे एक मोठे झाडही त्यांनी तोडले. याची कुणकुण लागताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. लाेकांना पाहून चंदन तस्कर तोडलेल्या झाडासह दोन दुचाकी (क्र. एमएच ५० पी ८६७५ व एमएच ०६ एडी ७६६२) जागीच सोडून पळून गेले. ग्रामस्थांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. वन विभागाने ताेडलेली झाडे व दाेन्ही दुचाकी जप्त केल्या.
गेल्या चार-पाच दिवसांत दोनवेळा चोरीच्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थ सतर्क होते. पहाटेच्यावेळी गावातील ओढ्याजवळ दोन दुचाकी संशयास्पदरित्या उभ्या असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांनी धूम ठोकली.
काळुंद्रेत दोन दिवसांपूर्वी दोन घरफोडींचे प्रकार घडले आहेत. भरदिवसा एका घरातून २५ हजारांची रोख रक्कम चाेरीस गेली, तर दुसऱ्या घरातील साहित्याची नासधूस करण्यात आली हेाती.
फोटो : २२ काेकरुड २ व ३
ओळ : काळुंद्रे (ता. शिराळा) येथील चोरट्यांनी तोडलेली चंदनाची झाडे व चोरीसाठी वापरण्यात आलेल्या दाेन दुचाकी जप्त केल्या.