सांगली : कडेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयाने २५ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. यशवंत मारूती ऐवळे (वय ६५) आणि निवास मारूती ऐवळे (५८, दोघेही रा. शिवाजीनगर, कडेगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, १६ मे २०२० मध्ये ही घटना घडली होती. त्याअगोदर चार महिन्यापूर्वी आरोपी यशवंत ऐवळे याने पिडीत मुलीस खाऊ देतो म्हणून ऊसाच्या शेतात नेऊन जबरदस्तीने चारवेळा शारिरीक संबंध ठेवले होते. यानंतर १६ मे २०२० रोजी पिडीता अंडी आणण्यासाठी गावात चालली असताना, दुसरा आरोपी निवास ऐवळे याने तिला शेडमध्ये ओढून घेत शारिरीक संबंध ठेवले होते. तसेच कोणाला सांगितल्यास घरच्यांना ठेवणार नाही अशी धमकी दिली होती. यानंतर पिडीतेच्या पालकांनी कडेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दाखल केली.दोघांवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी याचा तपास केला. यात घटनास्थळाचा पंचनामा, आरोपी, पिडीतेचे व बाळाचे डीएनएचा नमूना पुणे येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. यानंतर दोघांवरही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.सरकारपक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीता, तिची आई, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, डॉक्टर आणि तपास अंमलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सर्व साक्षीदारांच्या साक्षींचा विचार करून दोन्ही आरोपींना दोषी ठरवत शिक्षा ठोठविण्यात आली.शिक्षेच्या मुद्यावर सरकारी वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. खटल्याच्या कामी कडेगावचे पोलिस कर्मचारी जे. आर. जाधव, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले यांचे सहकार्य मिळाले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघा भावांना २५ वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: June 15, 2023 5:56 PM