लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरफोडी, चोरीतील दोघा अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. त्यांनी महात्मा गांधी शाळेजवळील बंद असलेल्या घरातून घरफोडी करून रक्कम पळवली असल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, चोरी घरफोडीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलीस संतोष गळवे शहरात गस्तीवर होते. त्या वेळी विश्रामबाग येथे त्रिमूर्ती चौकात दोघे जण एकमेकांशी वाद घालत असल्याचे आणि संशयास्पद स्थितीत दिसून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर त्यांना देता आले नाही. त्यामुळे त्यांची झडती घेतली असता ३५ हजार रुपये मिळून आले. या पैशाबाबत चौकशी केली असता बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सांगली शहर, विश्रामबाग आणि मिरज येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ते पसार होते.