लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आटपाडी शहरात दोन ठिकाणी चोऱी करून एक लाख १३ हजार ३५० रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. रवी बिरा काळे (२७, रा. हाजापूर ता. मंगळवेढा) आणि विजय छबू काळे (२३, रा. फोंडाशिरस ता. माळशिरस) अशी संशयितांची नावे आहेत.
जिल्ह्यातील घरफोडी, जबरी चोरीच्या घटनांचा तपास करून गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याच्या सूचना अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हयांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेने पथक तयार केले आहे.
शुक्रवारी हे पथक सांगलीत गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की दोघे संशयित चोरीतील सोन्याचे दागिने कमी दरात विकण्यासाठी कुमठा फाटा येथे थांबले आहेत. त्यानुसार पथकाने तातडीने तिथे जात छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी रवी काळे याच्याकडे सोन्याचे दागिने तर विजयकडे मोबाईल मिळून आला.
पथकाने त्यांच्याकडे केेलेल्या चौकशीत त्यांनी ऑगस्ट महिन्यात आटपाडीत चोरी केल्याची कबुली दिली. आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. संदीप लवटे यांच्या घरी व मोहन अण्णा काळे यांच्या घरी ३० ऑगस्ट रोजी चोरी केली होती. संशयितांकडे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एक लाख १३ हजार ३५० रुपयांचा माल जप्त केला.
स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, अच्युत सूर्यवंशी, सतीश आलदर, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.