गणपती कोळी ।कुरुंदवाड : येथील शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या पदावर दोघांची निवड केल्याने पदाधिकारी चक्रावून गेले आहेत तर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मुळातच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतील फुटीतून न्यायालयीन वाद सुरू असताना शहर अध्यक्षपदावरून पुन्हा दोन गटांतील नवा वाद निर्माण झाल्याने राष्ट्रवादीतील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एक पद, दोन दावेदार’ या राष्ट्रवादीच्या राजकीय कुरघोडीची तालुक्यात चर्चा होत आहे.
शहरात भक्कम असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांतून अस्तित्वासाठी लढावे लागत आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरून पक्षात फूट पडली. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांना नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत अपयश आले असले तरी पाटील व राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चंगेज खान पठाण यांच्या नेतृत्वातून पालिकेत पाच नगरसेवक निवडून आणून पक्षाची ताकद सिद्ध केली.निवडणुकीनंतर पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यात आली. पालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या नावावरून राष्ट्रवादीत पाटील व पठाण अशी फूट पडली. याचा परिणाम उपनगराध्यक्ष निवडीवर झाला. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीत फूट पडून पठाण समर्थक तीन नगरसेवक विरोधात मतदान केले.
राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे पद रद्द व्हावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे राष्ट्रवादीतील संघर्ष टोकाला गेला. जिल्हाधिकाºयांनी पक्षप्रतोदांचा अर्ज फेटाळत नगरसेवक पात्र ठरविल्याने राष्ट्रवादीतील फुटीर गट प्रबळ झाला.हा वाद सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी जिल्हा राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची निवड करण्यात आली. येथील पक्षाच्या शहराध्यक्षपदी जिन्नाप्पा पोवार यांच्या निवडीची घोषणा केली तर दुसºयाच दिवशी या पदावर तानाजी आलासे यांना निवडीचे पत्र पक्षांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप पाटील यांनी दिले.
पोवार हे पठाणसमर्थक तर आलासे हे रावसाहेब पाटील गटाचे मानले जातात. मात्र, शहराध्यक्ष या एकाच पदावर दोघांची निवड केल्याने निवड झालेले पदाधिकारी चक्रावून गेले आहेत तर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत पडले आहेत. शहराध्यक्षपदासाठी दोन्ही गटांनी वेगवेगळी ताकद लावून आपल्या समर्थकांना पद दिल्याने पक्षातील संघर्षात आणखीन ठिणगी पडली असून वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. मात्र, नेमका शहराध्यक्ष कोण, या गोंधळात केवळ शहरवासीय नव्हे तर तालुक्यातील कार्यकर्ते पडले असून राजकीय कुरघोडी तालुक्यात चर्चेची बनली आहे.