सांगली : आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील सुनील पंडित या सराफाने सांगलीतील काही सराफांचे दागिने घेऊन पोबारा केल्याने संतप्त झालेल्या चार सराफांनी या सुवर्णकारागिराचा मुलगा उदय (वय २२) व नातेवाईक विश्वास अरुण महामुनी (२५) या दोघांचे अपहरण करून त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल ‘पेशवाई’मधील एका खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार आज (मंगळवार) सायंकाळी उघडकीस आला. गुंडाविरोधी पथकाने या दोन्ही तरुणांची सुटका केली आहे. याप्रकरणी या चारही सराफांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रशांत शिवाजी जाधव (४३, रा. पंचवटी अपार्टमेंट, गावभाग), संतोष नारायण सुर्वे (३७, केशवनाथ मंदिराजवळ, पाटील गल्ली), शरद तातोबा नार्वेकर (४०, सांभारे रोड, गावभाग) व सतीश दत्तात्रय पावसकर (५५, पत्रकारनगर, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांना उद्या (बुधवार) दुपारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील पंडित हे गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीत सुवर्णकारागिरीचे काम करतात. ते मूळचे आंधळगाव (मंगळवेढा) येथील आहेत. सराफांकडून दागिने घेऊन त्यापासून ते मणी तयार करून देत होते. संशयित पावसकर यांच्याकडून त्यांनी काही महिन्यांपूर्वी १५३ ग्रॅम सोने मणी बनविण्यासाठी घेतले होते. यातील ३५ ग्रॅम सोने मणी बनवून त्यांनी परत केले आहे; पण या व्यवसायात ते कर्जबाजारी झाल्याने उर्वरित सोने ते परत देऊ शकले नाहीत. तसेच सांगलीतील बंगला विकून ते गायब झाले. अन्य सराफांकडूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात दागिने घेतले होते; मात्र तेही त्यांनी परत केले नव्हते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सराफ त्यांचा शोध घेत होते. पंडित यांच्या शोधासाठी चारही संशयित दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी आंधळगावला गेले होते. सोने वसुलीसाठी तेथून त्यांनी पंडित यांचा मुलगा उदय व नातेवाईक विश्वास महामुनी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सांगलीत आणले. कोल्हापूर रस्त्यावरील हॉटेल पेशवाईमधील एका खोलीत डांबून ठेवले होते. हॉटेल परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना माहिती दिल्यानंतर सावंत यांनी गुंडाविरोधी पथकास कारवाईचे आदेश दिले. पथकाने सायंकाळी उदय व विश्वासची सुटका केली.
सराफाच्या मुलासह दोघांचे अपहरण सांगलीतील घटना : चार सराफांना अटक; सोने वसुलीसाठी कृत्य
By admin | Published: May 14, 2014 12:05 AM