बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील लोकनियुक्त सरपंच सुरेश ओंकारे यांच्या बेकायदेशीर कामांविरूध्दच्या दोन तक्रारींची निवेदने ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना गुरुवारी दिली.
खासगी कंपनीच्या केबल प्रकरणासोबतच, एका जागेच्या बेकायदेशीर व्यवहारप्रकरणी ही निवेदने आहेत.
खासगी कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामासंदर्भातील निवेदन माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य हणमंत कदम, शेखर पाटील यांनी दिले.
या निवेदनात सरपंच व ग्रामविकास अधिकार्यांनी सदर कंपनीला बेकायदेशीरपणे परवानगी दिली. त्यातून ग्रामपंचायतीचे नुकसान झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
दुसरे निवेदन सदस्य अनिल आवळे यांनी एका घर जागेच्या बेकायदेशीर व्यवहारातील सरपंचांच्या सहभागासंबंधी दिले आहे. या प्रकरणात जोतिबानगर येथील श्रीमती धुमाळ यांची घर जागा मीरा नवत्रे यांना ७० हजार रुपयांना विकली आहे. यामध्ये मध्यस्थ सरपंच सुरेश ओंकारे यांनी २० हजार रुपये धुमाळ यांना कमी दिले आहेत. या प्रकरणात बेकायदेशीर व्यवहार व अपहार हे दोन मुद्दे समोर आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.