कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे मंगळवार, ६ एप्रिल रोजी कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ जणांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यात कामेरीचे दोन रुग्ण कोरोनाबाधित झाल्याने रुग्णसंख्या १५ झाली आहे. मंगळवारी बाधित झालेल्यांत ऐतवडे बुद्रुक येथील दोन व इस्लामपूर येथील एक रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
दरम्यान, येडेनिपाणी उपकेंद्रात मंगळवारी ३१४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. अवघ्या ५ दिवसांत १३५३ जणांचे लसीकरण पूर्ण करून वाळवा तालुक्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांत लसीकरणात आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला .गावांत दुसऱ्या लाटेत अद्याप एकही कोरोनाबाधित नाही, तर कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामेरीसह अन्य पाच गावांत मंगळवारी अवघे १४७ जणांचे लसीकरण करण्यात आले. आजअखेर ३४४६ नागरिकांना लस देण्यात आली. कामेरी गावात दुसऱ्या लाटेत एका बाजूला बाधितांची संख्या वाढत आहे; मात्र लसीकरण संथ गतीने सुरू आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल. ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समितीने लसीकरणाच्या आवाहनाकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा व ४५ व त्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंध लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.