महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमनताई पाटील गटाचे दोन नगरसेवक संजय माने व मीराबाई ईश्वर व्हनखडे यांनी तासगाव येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार गटाला मोठा धक्का बसला आहे. तसेच आणखी दोन नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.काही दिवसांपासून शहरात चार नगरसेवक खासदार पाटील यांच्या गटात जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्यातील दोन नगरसेवकांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या तासगाव दौऱ्यामध्ये पक्ष प्रवेश केला. आणखी दोन नगरसेवकही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते लवकरच खासदार गटात प्रवेश करण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता आली होती. त्यावेळी अश्विनी पाटील यांना नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यास दिली होती. त्यांनी पक्ष नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला. परत नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागला. त्यावेळी खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून त्यांच्या गटाच्या सिंधूताई गावडे यांना नगराध्यक्षा केले. तेव्हापासून खासदार पाटील यांच्या गटात राष्ट्रवादीचे काही नगरसेवकांची भरती होऊ लागली.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेकवठेमहांकाळ नगरपंचायतचे चार नगरसेवक खासदार पाटील यांच्या गटात जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्यातील दोन नगरसेवक संजय माने व नगरसेविका मीराबाई व्हनखडे यांनी प्रवेश केला आहे. अन्य काही नगरसेवक खासदार पाटील यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
तालुक्यातील अन्य कार्यकर्ते भाजपातकवठेमहांकाळच्या दोन नगरसेवकांसह तालुक्यातील पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत, ईश्वर व्हनखडे, महांकाली साखर कारखान्याचे संचालक मोहन खोत, विठुरायाचीवाडीचे उपसरपंच धनाजी माळी, राजेश खोत, कवठेमहांकाळ लोणार समाजाचे अध्यक्ष शंकर खैरावकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोमनाथ टोणे यांचाही पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते झाला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.