पतंग उडविण्यासाठी बेकायदा चायनीज मांजाचा वापर सुरू असून या मांजामुळे पक्ष्यांचे जीव धोक्यात येत आहेत. झाडावर अडकलेल्या पतंगाच्या मांजात पंख अडकून पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. मिरजेतील शिवाजी स्टेडियमजवळ घारींची घरटी मोठ्या प्रमाणात आहेत. मांजात अडकल्याने एक घार जखमी झाल्याने येथील नागरिकांनी प्राणीमित्र अशोक लकडे यांना पाचारण केले. घारीच्या पंखात गुंतलेला मांजा प्राणीमित्रांनी काढून या घारीला जीवदान दिले.
नामदेव मंदिर येथेही मांजामुळे जखमी झालेल्या घारीवर प्राणीमित्रांनी उपचार केले. सध्या पतंग उडविण्याचा हंगाम सुरू असून गेल्या दोन महिन्यांत अनेक पक्षांना प्राणीमित्रांनी वाचविले आहे. पतंग उडविण्याच्या आनंदासाठी निसर्गात विहार करणाऱ्या पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी चायनीज मांजाची चोरून विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राणीमित्र अशोक लकडे यांनी केली.