सांगली : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेल्या कोट्यवधीच्या ठेवी ‘आर्थिक लाभा’साठी खासगी बँकांत वळवल्याचा पहिला फटका महापालिकेला बसला. मार्चअखेरीस मक्तेदारांना बिल देताना बँकेच्या गोंधळात बँकेने दोन वेळा बिल पाठवल्याने मक्तेदारांची दिवाळी झाली. या बँकेने तब्बल दोन कोटी जादा रक्कम ६० मक्तेदारांच्या खात्यावर परस्पर जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने संबंधित बँकेला पत्र पाठवून दोन दिवसांत सदर रक्कम महापालिकेच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे.या बँकेने महापालिकेच्या खात्यावरचे जादा पैसे मक्तेदारांच्या खात्यावर वर्ग केल्याने महापालिकेच्या खात्यावर अत्यावश्यक सेवेसाठीही पैसे नाहीत. यामुळे व्यवहार मार्गी लागण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.मार्चअखेरीस मक्तेदार व अन्य खर्च यासाठी प्रशासनाकडून नियोजनाची घाई सुरू होती. मक्तेदारांची बिले देण्यासाठी प्रशासनाने यादी तयार करून या खासगी बँकेकडे दिली होती. सुमारे साठ मक्तेदारांना दोन कोटी देण्याची सूचना दिली होती. ३० मार्च रोजी यादी पाठवली. बँकेने पैसे मक्तेदारांच्या नावावर ऑनलाइन पाठवले. ३१ मार्च असल्याने सर्व ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले होते. ते पैसे मध्येच अडकले. दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले नाहीत, म्हणून बँकेकडून पुन्हा ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया पार पडली. तोपर्यंत मक्तेदारांच्या खात्यावर दोनवेळा पैसे गेले. चारऐवजी आठ लाख रुपये प्रत्येक मक्तेदाराच्या खात्यावर जमा झाले. यामुळे मक्तेदारांची न मागता काही दिवसांपुरती का होईना दिवाळी झाली.तोपर्यंत हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येताच प्रशासनाने तत्काळ बँक प्रशासनाला पत्र पाठवले. पैशांची जबाबदारी तुमची आहे. दोन दिवसांत सदर पैसे जमा करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तीन-चार मक्तेदारांनी बँक खात्यात आलेले जादा पैसे ऑनलाइन परत केले.
आता बाकी मक्तेदारांच्या नावावर जादा जमा झालेले पैसे महापालिकेच्या खात्यावर कसे जमा होणार? बँक आणि प्रशासन दोन्ही मक्तेदारांचे नंबर शोधत आहेत. बँकेने दोनदा पैशांची एन्ट्री केल्याने महापालिकेच्या खात्यावरचा शिल्लक निधीही संपला. आता अत्यावश्यक बाबीसाठी लागणारी शिल्लकही खात्यावर नाही. यातच कर वसुली ५० टक्क्यांपेक्षा खाली झाल्याने तिजोरीत खडखडाट आहे.