देवराष्ट्र : अंबक (ता. कडेगाव) येथे सोनहिरा कारखान्याजवळ मोटार (क्र. एमएच १० बीए ९६६) व मोटारसायकल (क्र. एमएच १० बीई ८३१७) यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत देवराष्ट्र येथील विलास बंडू महिंद (वय ४२) व संगीता भाग्यवंत गवाळे (४७) यांचा मृत्यू झाला. अपघातातील दोघेही अंदाजे पंधरा ते वीस फूट उडून पडले होते. मोटार २० फूट नाल्यात पडली होती. ही घटना बुधवारी दुपारी सव्वादोन वाजता घडली.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देवराष्ट्र येथील विलास महिंद व संगीता गवाळे हे कडेगावहून मोटारसायकलीने अंबकमार्गे देवराष्ट्रकडे निघाले होते. सोनहिरा कारखान्याचे सर्कल ओलांडून अंबक रस्त्याजवळ आल्यावर महिंद यांच्या मोटारसायकलला अंबकहून सोनहिरा कारखान्याकडे येणाऱ्या मोटारीने समोरून धडक दिली. या धडकेत मोटारसायकलचालक पंधरा ते वीस फूट लांब फेकला गेला, तर महिला रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या १५ फूट लांब नाल्यावरून पलीकडे जाऊन पडली होती. यात मोटारसायकलचालक महिंद यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. संगीता गवाळे यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्या जखमी झाल्या होत्या.अपघातातील मोटारसायकलचा चक्काचूर झाला असून, मोटार नाल्यात पडली होती. मोटारीचा चालक व त्यासोबत असलेली महिला यांना कोणतीही इजा झाली नव्हती. अपघातानंतर मोटारीचा चालक व महिला पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच सोनहिरा कारखान्याचे कार्यकारी अभियंता शरद कदम यांनी दोन गाड्या व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या मदतीने जखमींना चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण जखमींची तपासणी करून गंभीरता लक्षात घेता येथील वैद्यकीय अधिकाºयांनी कºहाड येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.चिंचणी येथून जखमींना खासगी गाडीतून कऱ्हाड येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिंद व गवाळे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन कºहाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे केले. या घटनेची नोंद चिंचणी-वांगी पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.देवराष्ट्रवर शोककळाया अपघातात मृत झालेल्या संगीता गवाळे या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करीत होत्या. त्यांच्या पतीचेही मागील काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, गवाळे यांच्यावरच मुलींच्या शिक्षणाचा खर्च व घर चालत होते. तर महिंद यांची परिस्थितीही गरिबीची असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तीन मुली झाल्या अनाथया अपघातात मृत झालेल्या संगीता गवाळे यांना पाच मुली आहेत. यापैकी दोघींची लग्ने झाली असून, तीन मुली शिक्षण घेत आहेत. वडिलांच्यानंतर आईही सोडून गेल्याने या तीनही मुली अनाथ झाल्या आहेत.
मोटारचालक सोनहिरा कारखान्याचा वरिष्ठ अधिकारीमोटारचालक पसार झाल्याचे पोलीस सांगत असले तरी, घटनास्थळी केलेल्या चौकशीत मोटारचालक हा सोनहिरा कारखान्याचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे समजते.