जत : जतजवळ पाटील मळ्यात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून शाळकरी मुलासह दोघांचा मृत्यू झाला; तर महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. रोहित अजित माने-पाटील (वय १६) व शिवाजी पांडुरंग म्हारनूर (२७) अशी मृतांची नावे आहेत.
जत येथील जत-गाडगेवाडी रस्त्यावर अंबाबाई मंदिर डोंगराच्या पायथ्याशी पाटील मळा आहे. गुरुवारी रोहित पाटील आई अनिता व शिवाजी म्हारनूर यांच्यासह त्याच्या चुलत्याच्या शेतात काम करत होता. या शेतातून गेलेली विजेची तार तुटून पडली होती. हे रोहित व शिवाजी यांच्या लक्षात आले नाही. शेतात काम करताना दोघांचाही या तारेला स्पर्श झाला आणि धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोहितचा तारेला स्पर्श झाल्याचे लक्षात आल्यावर त्याची आई त्याला वाचविण्यासाठी पुढे आली; पण धक्का बसून तीही बाजूला फेकली गेली.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती देऊन वीज प्रवाह बंद केला. जखमी रोहितच्या आईला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
परिसरात हळहळ
एकाचवेळी दोघांचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याने जत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी म्हारनूर शेती करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. रोहितच्या पश्चात आजी-आजोबा, आई, बहीण असा परिवार आहे. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.