सांगली : मिरज तालुक्यातील बुधगाव येथे भिंत पाडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत हाणामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी फिर्याद सांगली ग्रामीण पोलिसांत दाखल केली आहे.
रोमन लाजारस आवळे (रा. आवळे गल्ली) यांनी आदम केरू आवळे, स्वप्नील आदम आवळे या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयितांना भिंत का पाडली म्हणून विचारल्यानंतर त्यांनी रंध्याने डोकीत व हातावर मारून फिर्यादी रोमन यांना जखमी केले.
आदम केरू आवळे यांनी रोमन लाजारस आवळे व आशाताई लाजारस आवळे या दोघांविरोधात फिर्याद दिली असून, त्यात संशयित हे जनावरांच्या भिंतीजवळ कोबा करत असताना, माझी हद्द सोडून कोबा कर म्हणून फिर्यादींनी सांगितल्यावर त्यांनी विटेने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.