सांगली : शहरातील जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मीकी आवासमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबांत मारामारी झाली. शुक्रवार, दि. ४ जून रोजी सकाळी ही घटना घडली. दोन्ही कुटुंबांनी शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
जुन्या भांडणाच्या रागातून वाल्मीकी आवास येथे दोन कुटुंबांत दगड व काठीने मारामारी झाली. शुक्रवार दि. 4 रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी सात जणांविरुद्ध परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. मारामारीच्या प्रकारानंतर गणेश संभाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नामदेव ज्ञानेश्वर जाधव, अमोल सचिन साठे, गेंड्या सचिन साठे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. जुन्या भांडणाचा राग धरून संशयितांनी डोक्यात दगड मारून व फिर्यादी गणेशच्या आई व बहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच नामदेव ज्ञानेश्वर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत गणेश संभाजी शिंदे, संभाजी शिरपती शिंदे, राणी संभाजी शिंदे आक्काताई संभाजी शिंदे (सर्व रा. वाल्मीकी आवास, सांगली) यांच्या विरुद्ध फिर्याद देत जुन्या भांडणाच्या रागातून
लाथाबुक्क्यांनी मारहाण करून काठीने डोक्यात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटाच्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.